19 January, 2015

पोखिला- अपहरणाचे 81 दिवस (पुस्तक परीक्षण)

खरतर अपहरण होणे हे किती भयावह असू शकते आणी त्यातल्या त्यात NDFB (National Democratic Front for Bodoland) सारख्या उग्रवादी संघटनेकडून अपहरण होणे आणी 81 दिवसांनी त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटणे हे एक दिवास्वप्नच असू शकते. आणी हे दिवास्वप्न सत्यात उतरलं आहे त्याचं नाव आहे विलास बर्डेकर. विलास बर्डेकर हे भारतीय वन खात्यात अधिकारी आहे. फुलपाखरावर चालू असलेल्या अभ्यासामुळे आणी फोटोग्राफिच्या आवडीमुळे ते इगलनेस्ट अभयारण्यात जाऊन पोहोचले आणी तिथे त्यांना NDFB तर्फे बंदी बनविण्यात आले.

बंदिवासात असताना आर्मीच्या भीतीमुळे सतत बदलत राहणारे कॅम्प, मैलो-मैल होणारी पायपीट, बेचव जेवण, कुटुंबांबद्दलची लागून राहिलेली चिंता त्याच बरोबर पप्पु, सपन, शंकर, देबू ई. अपहरण कर्त्यातर्फे मिळणारी प्रेमाची वागणूक आणी काळजी ई. विरोधाभासात्मक गोष्टींचे अनुभव बर्डेकरांना आले. त्याचे वरिष्ठ सहकारी, मुख्यमंत्री, राज्यपाल इत्यादींनी त्यांच्या सुटकेसाठी चालविलेले प्रयत्न ई. बऱ्याच गोष्टीबद्दल लेखकाला आलेले अनुभव येथे वाचायला मिळतात. एखाद्या चित्रपटातील अपहरणातील थरारनट्याइतके हे अनुभव थरारक नसले तरी खरे अनुभव असल्याने पुस्तकाची उत्सुकता लागुनच राहते.

नौकरीच्या सुरवातीचे काही वर्ष चंद्रपूर, गडचिरोली ई. भागातील जंगलात काढल्याने त्या भागातील जंगलात लेखकाला जे अनुभव आले आणी त्यानंतर आसामच्या ह्या भागातल्या जंगलातील परिस्थिती कळली असता दोन्ही ठिकाणच्या जंगलात, तिथले वन खाते, लाकडाची होणारी तस्करी, नक्षलवाद्यांनी चालविलेल्या चाळवली ई. अनुभव अगदी विरोधी टोकाचे आहे.

विलास बर्डेकरांना आलेले अनुभव त्यांचे सहकारी मित्र अरविंद आपटे यांनी शब्दबद्ध केले आहे. अतिशय ओघवत्या आणी सुटसुटीत शैलीत त्यांनी पुस्तकाचे शब्दांकन केले आहे. पुस्तक वाचताना डोळ्यासमोर प्रसंग उभे राहतात आणी वाचतांना पान कसे भराभर सरकत जातात ते कळतच नाही. त्याच बरोबर जंगलात भटकायची आवड असणाऱ्यांसाठी किवा फुलपाखरांची आवड असणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी बरीचशी माहिती या पुस्तकातून तसेच लेखकाला आलेल्या अनुभवातून मिळते. एकंदरीत वाचनीय आणी वाचकाला खिळवून ठेवणारे हे पुस्तक नक्कीच आहे.


पुस्तकाचे नाव:- पोखिला- अपहरणाचे 81 दिवस 
लेखक:- विलास बर्डेकर 
शब्दांकन:- अरविंद आपटे
प्रकाशन:- पद्मगंधा प्रकाशन, पुणे 
पाने:- 240 
किमत:- 240/- 

No comments:

Post a Comment