16 September, 2014

इतर लोक आपल्याला तेवढंच समजतील जेवढी त्यांची आपल्याला समजून घेण्याची लायकी असेल.

खरतर इतरांनी आपल्याला काय समजावे हे आपल्या हातात नसते. त्यांनी आपल्याला काय समजावे यासाठी आपण प्रयत्न करू शकतो परंतु आपल्याप्रती त्यांचा दृष्टीकोन कसा आहे ह्यावर ते आपल्याला काय समजेल व आपल्याशी कसे वागेल हे ठरत असते. नाहीतर तुम्ही बघा ना, आपण एखाद्याशी खूप प्रेमाने, आपुलकीने वागतो तरी त्याच्या वागण्यातील तुसडेपणा काही केल्या कमी होत नाही किवा झालाच तरी तो फक्त समोरासमोर भासविण्यापूर्ती असतो. तेच एखादी व्यक्ती आपल्याशी प्रेमाने, आपुलकीने वागत असते परंतु आपल्याला त्या व्यक्तीबद्दल म्हणावा तितका जिव्हाळा वा आपुलकी निर्माण होत नाही.

एकदा हॉटेल मध्ये काही मित्रांसोबत चहा पित बसलो होतो. गप्पांचा फड रंगला होता. तेवढ्यात बाजूच्या टेबलावरील एक गृहस्थ वेटरच्या नावाने ओरडायला सुरुवात करतो. वेटर लवकर डिलिवरी देत नाही म्हणून तो गृहस्थ त्याला खूप शिव्या देत होता. पण वेटर त्यावर काहीच प्रतिक्रिया न देता शांतपणे ते सर्व ऐकून घेत होता. काही वेळाने तो गृहस्थ तावातावाने उघून जातो व वेटर आपल्या कामी लागतो. नंतर जेव्हा वेटर आमच्या टेबलापाशी आला तेव्हा त्याने नेहमी प्रमाणे अगदी स्मितहास्य करून आमची ऑर्डर स्वीकारली. त्याच्या ह्या प्रसन्न रुपाकडे पाहून आम्ही चाट पडलो. मनोजने त्याला विचारले कि एवढा अपमान झाल्यावर सुद्धा चेहऱ्यावर स्मितहास्य आणी इतक्या शांतपणे तुम्ही कसं काय काम करू शकता...???


त्यावर वेटर अगदी शांतपणे उत्तरला,"इतर लोक आपल्याला तेवढंच समजतील जेवढी त्यांची आपल्याला समजून घेण्याची लायकी असेल....."
"या हॉटेल मध्ये 12 टेबल आहे आणी 4 वेटर. आज २ वेटर सुट्टीवर होते त्यामुळे आम्ही दोघच वेटर सर्व 12 टेबल सांभाळत आहो. परंतु त्या गृहस्ताला हे कस कळेल? त्यामुळे त्याने मला तेवढंच समजून घेतलं जेवढी त्याची क्षमता होती".

एवढ बोलून ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला. त्यानंतर चहा पित असताना त्या वेटरचे ते विचार माझ्या मनात घोळत होते. मनुष्याला छोट्या - छोट्या घटनेतून देखील बरेच मोटिवेशन मिळते जे स्व- मोटिवेट व्हयला मदत करते.

वेटर आपल्या कामात चोख होता. आपल्यापरीने तो जास्तीत जास्त ग्राहकाला सेवा प्रदान करीत होता. परंतु त्या गृहस्थाला तो वेटर आणी त्याची सेवा कळली नाही व त्याच्या दृष्टीतून त्या वेटरने चांगली सेवा दिली नव्हती म्हणून तो गृहस्थ चिडला होता.

कित्येक वेळेस आपलीही अवस्था त्या चिडलेल्या गृहस्थासारखी होते. एखाद्या व्यक्तीला किवा तिच्या कामाला समजून घेण्याची आपलीच लायकी म्हणा वा तयारी म्हणा, ती नसते आणी मग आपण त्या व्यक्तीच्या नावाने खडे फोडत असतो. मग आपण आपले विचार, आपले मत त्या व्यक्तीबद्दल अमुक-अमुक प्रकारची व्यक्ती म्हणून करून घेतो. त्यासंबंधीचे चित्र आपल्या डोक्यात ठासले जाते आणी मग त्या व्यक्तीला आपण अमुक-अमुक वर्गवारीत मोडून आणी लेबल लावून मोकळे होतो. त्यानंतर आपला त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. आपल्या अश्या वागण्याने समोरच्या व्यक्तीचादेखील आपल्याप्रती दृष्टीकोन बदलतो व येथून संबंध बदलायला सुरवात होते.

म्हणून दुसऱ्याकडून बदलाची अपेक्षा, त्याने आपल्याला आवडेल असे वागणे अश्या अपेक्षा करण्यापेक्षा आपण त्या व्यक्तीला समजून घेण्याची आपली लायकी, आपली कुवत वाढविली पाहिजे. बऱ्याचश्या समस्या आपल्या समजून घेण्यानेच सुटून जातील हे मात्र नक्की. 

No comments:

Post a Comment