22 May, 2014

केजरीवालांचा भांगडा


सध्या पंजाबी लोकांपेक्षा जास्त जोमात भांगडा अरविंद केजरीवाल नावाचे गृहस्त करीत आहे. अन्ना हजारेंच्या आंदोलनापासून सुरु झालेला हा भांगडा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदापर्यंत व त्या पदाच्या राजीनाम्यापासून तिहार जेल पर्यंत त्यांचा हा भांगडा अविरत सुरु आहे. फरक एवढाच आहे, पंजाबी लोकांचा हा भांगडा सांस्कृतिक असतो तर केजरीवालांचा हा भांगडा निवळ राजकीय आहे.

IIT तुन इंजिनीअर झालेले व त्यानंतर UPSC सारखी कठीण परीक्षा पास करून केंद्र सरकारमध्ये आयकर आयुक्त राहिलेले केजरीवाल तसे इतर राजकरण्यानपेक्षा हुशार गृहस्त. त्यातल्या त्यात व्यवसायी, व्यापारी, गुंड, बिल्डर इ. लोकांनी राजकारणात येण्याची परंपरा असताना उच्चपदावरची सुरक्षित नौकरी सोडून (रिटायर होऊन आलेल्यांबद्दल नाही) राजकारणात येऊन समाजासाठी काहीतरी करणारे कमीच. केजरीवाल त्या कमीतलेच एक. 

समाज सेवेसाठी त्यांनी 'परिवर्तन' नावाची संस्था काढली. त्याद्वारे होणारी सेवा कमी कि काय म्हणून नोकरीचा राजीनामा देऊन समाजसेवेत पूर्णवेळ झोकून दिले. अण्णांच्या जनलोकापाल आंदोलनाद्वारे केजरीवाल संपूर्ण भारताला परिचित झाले. 

समाजसेवेची खाज असणार्यांची राजकारणातील कमी आणी बुद्धिवंतांची राजकारणाविषयी असलेली उदासीनता ह्यातील पोकळी आपल्या कर्तुत्वाने आणी कर्माने पूर्ण होऊ शकते व आपल्या सरकारमधील अनुभव आणी बुद्धीचातुर्याच्या जोरावर राजकीय पटलावर फासे टाकत आंदोलनाचे हत्यार वेळोवेळी उपसत सरकारला नेस्त नाबूत करता येते आणी पर्यायी सक्षम सरकार देऊन विकास साधता येतो अशी केजरीवालांची धारणा होती आणी त्यातूनच आम आदमी पार्टीचा जन्म झाला.

चिखल साफ करण्यासाठी चिखलात उतरावेच लागते म्हणत राजकारणात उतरून त्यातील गंदगी साफ करणे चिखल साफ करण्याइतके सोपे नकीच नसते. आणी याची जाणीवही केजरीवालांना नव्हती असे नाही. जनलोकपालामुळे प्रसिद्धी पावलेल्या, विकासाच्या बाता मारत राजकारण करण्याच्या आणी कॉंग्रेसवर असणाऱ्या जनतेच्या रोषामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप ला चांगलेच यश मिळाले. सत्ता पण स्थापन झाली. व त्यानंतर खरा भांगडा सुरु झाला.

काहीही झालं तरी कॉंग्रस वा भाजप च्या पाठींब्यावर सरकार स्थापन करणार नाही, वेळ आली तर विरोधी बाकावर बसू असे सुरुवातीला म्हणणारे केजरीवाल आपल्या सारख्या बुद्धिजीवींनी काहीही केलं तरी जनतेचा आपल्याला पाठींबाच मिळेल ह्या तोऱ्यात होते. मुख्यमंत्री झाल्यावर सरकारी बंगला, गाडी  घेणार नाही असे सुरवातीला सांगून नंतर त्या गोष्टी न नाकारता आल्याने पहिल्यांदा केजरीवालांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. आपल्याच राज्यात मुख्यमंत्री काही मागण्यासाठी आंदोलन करतो, त्यासाठी तो रस्त्यावर उतरतो, त्यामुळे आपल्याच जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल याची जाणीव नसल्याने किवा असेलही परंतु ती जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याने जे दिल्लीत घडले ती गोष्ट म्हणजे त्यांचा तिसरा भांगडा होता. उठसुठ रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या केजरीवालांना विरोधकाची भूमिका उत्तम जमली असती हे त्यांनी आता स्वीकारायला पाहिजे.

दिल्ली विधानसभेत लोकपाल बिल पास न झाल्यामुळे सरळ राजीनामा देऊन मोकळे होत आणी याचा दोष कॉंग्रेस, भाजप च्या पदरात टाकत आप ने सहानभुतीची चाल खेळली. दोन चार बुद्धीजीविंना हाताशी घेऊन लोकपाल, काळा पैसा इ. गोष्टीवर सुसंस्कुत मुद्दे मांडत दोन वेळच्या जेवणासाठी काम करणाऱ्या तसेच तथाकथित मध्यम वर्गात आपण कायम लोकप्रिय राहू ह्या आशेवर, कितीही कोलांटउद्या घेतल्यातरी तरी जनता सर्कशीतील जोकरला पाहायला येतात त्या प्रमाणे पुन्हा आपल्यालाच वोट देतील ह्या भाकितावर केजरीवालांनी डाव सोडला. हा यांचा सर्वात मोठा भांगडा होता.

सर्कशीत जोकराने कितीही पोट धरून हसायला लावलं म्हणून दुःख कमी होत नसते. जनतेचही तसच झालं व त्यांनी आपलं दुःख लोकसभेत आप ला दणका देऊन व्यक्त केलं. लोकसभेत विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याच्या बेतात असणाऱ्या आप चा सर्वेसर्वा लोकसभेतच जाऊ शकणार नाही (पुढची निवडणूक लढवत पर्यंत किवा मोदी वाराणसीच्या खासदारकीचा राजीनामा देत नाही तो पर्यंत तरी) हे किती मोठ दुर्दैव म्हणावं.

लोकसभा लढावतांना केजरीवालांनी अंबानी पासून गडकरीपर्यंत जो सापडेल त्या सर्वांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. (पण अजून त्यांनी त्यांच्या पक्षाला करोडोंचा निधी कुठून येतो याचा खुलासा केलेला नाही.) गडकरींनी त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला. त्यात दिल्ली येथील पटियाला हाऊस न्यायालयाने त्यांना जामिनाकरिता १०,००० चा बॉंड भरून देण्यास सांगितले. ते त्यांनी नाकारले आणी न्यायालयीन कोठडी स्वीकारली. तो सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक निर्णय. त्यात काही गैर नाही. परंतु जामीन नाकारण्यासाठी केजरीवालांनी देलेले कारण असे कि " हे माझे तत्व आहे कि जर मी गुन्हा केला नसेल तर मी जामीन का घ्यावं?" आता कुठलेही ठोस पुरावे नसताना एखाद्यावर भ्रष्टाचारचे आरोप करून त्याची प्रतिमा समाजात मलीन करणे हे काय केजरीवाल्यांसारख्या बुद्धजीविला गुन्हा नाही वाटत? पण त्यांचा हा भांगडा एवढ्यावरच थांबत नाही.

केजरीवालांनी फक्त अंडरटेकिंग भरून देण्यास समर्थता दर्शविली, बेल बॉंड व रक्कम नाकारली. त्यावर कोर्टातर्फे सांगावे लागले कि तुमच्यासाठी असा वेगळा न्याय नाही , अशी कुठलीही पद्धत कायद्यात नाही. ह्यापेक्षा मोठ दुर्दैव कोणतं आहे कि राजकारणात मोठ पद भूषवूपाहणारा व्यक्ती न्यायालयाला पण च्यालेंज करतो. हा त्यांचा भांगडा नक्कीच आम जनतेला रुचलेला नाही हे त्यांच्या प्रतिक्रियेवरून कळले. बर, एवढ सगळं कमी कि काय म्हणून आप पार्टीवाले पुन्हा रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी उतरले. प्रत्येक गोष्टीत आंदोलनाच्या तव्यावर आपली पोळी भाजून घेणारा आप या वेळेस कुणाच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला होता? न्यायालयाच्या?

No comments:

Post a Comment