13 October, 2014

ब्लॉगिंग हे करियर होऊ शकतं का.?

ब्लॉगिंग हे करियर होऊ शकतं का.? हा प्रश्न काही वर्षापूर्वी विचारला असता तर कदाचित याच उत्तर 'नाही' हेच असतं पण आज याचं उत्तर 'होय' हेच आहे. आज ब्लॉगिंग हे नक्कीच करियर होऊ शकतं. नुसतं करियरच नाही तर उत्तम करियर होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल कि आपण ब्लॉग लिहला त्याचा कुणाला फायदा होणार आणी त्यासाठी कोण आपल्याला पैसा देणारं..? याच उत्तर पुढे मिळेलच तुम्हाला.

मागच्या काही वर्षात इंटर्नेटचा वापर जगभरात प्रचंड प्रमाणात वाढला. सार जग एकमेकांना जोडल्या गेलं. कमी वेळेत आणी कमी खर्चात माहितीची देवान- घेवाण होऊ लागली. माहितीचं प्रचंड मोठ भांडारच लोकांपुढे उपलब्ध झालं. त्यातल्या त्यात गुगलच्या 'ओर्कुट' या साईटने खऱ्या अर्थाने सोशल नेट्वर्किंगची सरुवात केली. त्याने लोक जोडल्या जाऊ लागले. व्यक्त होऊ लागले. लिहू लागले. इंटर्नेटवर व्यक्त होणार्यांची संख्या वाढतच जाऊ लागली. आता लोकांना व्यक्त होण्यासाठी, लिहिण्यासाठी वेगळं व्यासपीठ हवं होत ते ब्लॉगिंग या संकल्पनेन लोकांना दिलं. मग लोक ब्लॉगिंग करू लागले. पूर्वी छंद किवा आवड म्हणून चालणारं ब्लॉगिंग नंतर पैसा मिळवून देऊ लागले आणी त्यामुळेच काही ब्लॉगवेड्यांनी चक्क उत्तम पगाराची नौकरी सोडून पूर्णवेळ ब्लॉगिंग करण्याचा निर्णय घेतला आणी आता ते त्याद्वारे चांगला पैसा आणी नाव कमावीत आहे. आणी हे ब्लॉगवेडं लोन फक्त अमेरिका किवा युरोपीय देशापुरती मर्यादित न राहता भारत, ब्राझील, पाकिस्तान तसेच आशिया, आफ्रिकेच्या विकसनशील देशात पोहोचलं. लोक लिहू लागले, व्यक्त होऊ लागले, आपले अनुभव, विचार ब्लॉगद्वारे मांडू लागले. त्यांनी लिहिलेले ब्लॉग्स मग इतर वाचकांसाठी माहितीचा, अनुभवाचा खजिनाच ठरू लागले. 

भारतातही आता पूर्णवेळ ब्लॉगिंग करणाऱ्याची संख्या वाढू लागली आहे. अजुनतरी भारतात ब्लॉग लिहिनार्यांच आणी वाचणार्यांच प्रमाण पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत कमीच आहे. काही ब्लॉगलेखक आपल्या ब्लॉगद्वारे वेबसाईटपेक्षाही तुलनेने अधिक दर्जेदार माहिती आपल्या वाचकांना उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे 'ब्लॉगलेखक' हे आधुनिक लेबल त्यांना मिळू लागलं आहे. त्यांचे ब्लॉग लोक आवर्जून वाचतात, त्यावर आपला अभिप्राय देतात, त्यांच्याशी संपर्क साधतात. ब्लॉगलेखकांमध्ये इंग्रजी ब्लॉग लेखक आघाडीवर आहे. साहजिकच इंग्रजीमुळे त्यांचा आवाका भारतापुर्ती मर्यादित न राहता संपूर्ण जगभर विस्तारित होतो. इतरही देशातून वाचकसंख्या लाभते. पण त्याच बरोबर इतर भारतीय भाषेतील ब्लॉग्ससुधा दिवसेंदिवस वाढू लागले आहे. आता लोक आपल्या मातृभाषेत का होईना परंतु लिहू लागले आहे, व्यक्त होऊ लागले आहे. यात हिंदी, बंगाली, मराठी, तेलगु, तमिळ ई. भाषिक ब्लॉग्स आघाडीवर आहे.

आता ब्लॉग म्हणजे काय.? ब्लॉगची व्याख्या आपण आपल्याला हवी तशी करू शकतो. ब्लॉग्सच्या असंख्य व्याख्या मिळतील तुम्हाला पण माझ्या मते 'ब्लॉग म्हणजे एक असं ऑनलाईन व्यासपीठ जिथे आपण आपल्या मनात येणाऱ्या विचारांना वाट मोकळी करून देऊ शकतो'. ब्लॉगला आपण एक वेबसाईट म्हणून किवा आपली डायरी म्हणून सुधा चालवू शकतो. इतर लोकांनी आपल्याला जाणून घेण्याचा हा जणू बायोडाटाच असतो. त्याच प्रमाणे आपल्या व्यक्तीमत्वाची जाहिरात करण्याचं उत्तम साधन पण होऊ शकतं. तुम्ही ब्लॉग कसा आणी कोणत्या कारणासाठी वापरता ह्यावरून त्याच अस्तित्वं ठरत असतं. पण ब्लॉगद्वारे पुष्कळ माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असते. म्हणजे बघा ना, कॅनडातील कॅलगरी या शहरातील एखाद्या व्यक्तीने आपल्या ब्लॉगवर टाकलेली एखादी माहिती वा अनुभव फिलीपाईन्सच्या मनिला शहरातील एखादी व्यक्ती सहज वाचू शकते. एवढेच नाही तर त्यावर आपला अभिप्राय किवा मत सुधा नोंदवू शकते.

आज ब्लॉग विश्वात ब्लॉगर आणी वर्डप्रेस या मोफत ब्लॉग सुविधा पुरविणाऱ्या वेबसाईटची चलती आहे. वरील दोन्ही साईटद्वारे तुम्ही रजिस्टर करून आपला ब्लॉग मोफत सुरु करू शकता. एकदा ब्लॉग लिहीन सुरु केलं कि मग महत्वाचा प्रश्न उरतो तो हा कि आपल्या ब्लॉग ला वाचक कसे लाभणार.? म्हणजे लोक आपल्या ब्लॉग पर्यंत कसे पोहोचणार.? यावर सोपा उपाय म्हणजे आपला ब्लॉग, ब्लॉग अग्रेगेटरवर जोडणे.(ब्लॉग अग्रेगेटर म्हणजे ब्लॉग्सच संकलन करणारी वेबसाईट.) एकदा आपला ब्लॉग, ब्लॉग अग्रेगेटर जोडला कि त्या ब्लॉग अग्रेगेटरवरील वाचक आपल्या ब्लॉगवर पोस्ट झालेला लेख सहज वाचू शकतात. काही मराठी ब्लॉग्सच्या ब्लॉग अग्रेगेटर साईट पुढील प्रमाणे आहे. मराठीब्लॉगर्स, मराठी मंडळीब्लॉगकट्टा, मराठी ब्लॉगलिस्ट, मराठी ब्लॉगजगत ई.(त्यांना भेट द्यायची असल्यास त्यांच्या नावावर क्लिक करा.) या साईटवर आपला ब्लॉग जोडून आपण आपला ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

काही संशोधक संस्थेच्या संशोधनातून असा निष्कर्ष निघाला आहे कि येणाऱ्या काळात ब्लॉग लेखकांची संख्या प्रचंड वाढणार आहे आणी वाचक लोक माहिती मिळविण्याकरिता एखाद्या वेबसाईटपेक्षा ब्लॉगला जास्त पसंती देणार म्हणून. (काही प्रमाणात आजही देतच आहे.) त्याच बरोबर ब्लॉग्सच मार्केट प्रचंड वधारणार असून याचा ब्लॉगलेखकांना नक्कीच फायदा होणार आहे.

अमित अगरवाल, अभिषेक भटनागर, आशिष सिन्हा, अंशुल तिवारी, मनीष चौहान, अरुण प्रभुदेसाई  ई. (वरील मंडळींच्या ब्लॉग्सला भेट द्याची असल्यास त्यांच्या नावावर क्लिक करा.) हि अशी काही तरुण मंडळी आहेत जी पूर्णवेळ ब्लॉगिंग करतात  आणी त्याद्वारे चांगला पैसाही कमवितात. यातील बहुसंख्या ब्लॉगर हे तंत्रज्ञानावर लिहिणारे आहे. पण इतरही विषयावर लिहिणाऱ्या ब्लॉगर्सची संख्या वाढत आहे. UPSC, MPSC, बँकिंग ई. स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी वेळात वेळ काढून स्पर्धा परीक्षेसंबंधी ब्लॉग लिहू शकतात. उदा. बँकर्स अड्डाMPSC अलर्ट ई. आणी त्याद्वारे जर इन्कम झाली तर 'सोनेपे सुहागा'च. त्याच प्रमाणे मोठ्या पदावर काम करणारे अधिकारी, व्यावसायी, सनदी अधिकारी ई. लोक आपला अनुभव इतर लोकांशी खासकरून युवकांशी ब्लॉगद्वारे शेयर करू शकतात. प्रीती शेनोय नावाच्या लेखिका आपणाला माहीतच असणार. त्यांनी एका ब्लॉगद्वारे आपल्या लिखाणाला सुरवात केली. त्यांच्या ब्लॉग वरील त्यांचे लेख वाचून त्यांना टाईम्स ऑफ इंडिया या दैनिक वृत्तपत्राने आपल्या वृत्तपत्रात लेख लिहिण्यासाठी निमंत्रण दिले. पुढे त्यांचा काही कादंबऱ्यासुधा प्रकाशित झाल्या त्यातली 'लाईफ इज व्हाट यु मेक इट' बरंच गाजलं.

आता प्रश्न आहे कि ब्लॉगद्वारे पैसा मिळवायचा कसा.? याचं उत्तर आहे 'जाहिरातीद्वारे'. नक्कीच जाहिरात क्षेत्र हे फार मोठ आहे. इंटरनेटद्वारे प्रचंड प्रमाणात जाहिरात होते आणी 'ब्लॉग्स' हि त्याला अपवाद नाही. आपण जो कोणता ब्लॉग लिहित असू त्यावर आपण जाहिरात प्रसिद्ध करून पैसे मिळवू शकतो. अर्थातच तो ब्लॉग दर्जेदार असावा लागेल आणी वाचकांनी त्यावर परत- परत त्याला भेट द्यावी असं काहीतरी त्यात असावं लागेल. 

'गुगल एडसेन्स' हे आज आपल्या ब्लॉगवर जाहिरात लावण्याच सर्वात मोठ माध्यम आहे. या सेवेद्वारे तुमच्या ब्लॉगवर जाहिराती दिसतील आणी त्या जाहिरातीवर जसजशे लोक क्लिक करत जातील तसंतशे तुम्हाला पैसे मिळत जातील. त्याच प्रमाणे 'एफिलेट मार्केटिंग' हा जाहिरातीचा उत्तम पर्याय ब्लॉगलेखकांसमोर उपलब्ध आहे. या द्वारे आपण आपल्या ब्लॉगवर हव्या त्या वस्तूच्या जाहिराती दाखवू शकता आणी जर एखाद्याने त्या वस्तूच्या साईटवर जाऊन ती वस्तू खरेदी केली तर त्या वस्तूच्या किमतीच्या 5% ते 25% पर्यंतच कमिशन तुम्ही मिळवू शकता. अर्थात त्याबद्दल मी आपल्याला माझ्या पुढच्या लेखात माहिती उपलब्ध करून देईल. तर अश्या ह्या गुगल एडसेन्स आणी एफिलेट मार्केटिंगद्वारे पुष्कळशे ब्लॉगर चांगली कमाई करीत आहे. अर्थात त्यासाठी ब्लॉगचा दर्जा उत्कृष्ट ठेवणे आणी त्यात कालानुरूप बदल करने आवश्यक आहे.

त्यामुळे नक्कीच ब्लॉगिंग हे पूर्णवेळ करियर होऊ शकते. पण त्यासाठी तेवढ्याच मेहनतीची आणी दर्जेदार लिखाणाची गरज आहे. नुसता ब्लॉग बनविला आणी त्यात जाहिरात चीटकविल्या म्हणजे झालं असं होत नाही. वाचकांना परत परत आपल्या ब्लॉगला भेट द्यायला लावणे आणी त्याला ब्लॉगवर जास्त वेळ खिळवून ठेवणे जरुरी असते, त्यासाठी दर्जेदार लेखन करने आवश्यक असते. जो हे करू शकतो त्यासाठी ब्लॉगिंगसारखं उत्तम करियर त्याची वाट पाहत आहे. सध्यातरी त्यासाठी फक्त इंग्रजीत ब्लॉग लिहिणे आवश्यक आहे. कारण सुरुवातीला लिहिल्या प्रमाणे इंग्रजीचा व्याप वाचकवर्ग खूप मोठा आहे त्याचा ब्लॉगला नक्कीच फायदा मिळतो. पुढे भारतीय भाषेतील ब्लॉग वाचकांची संख्या वाढल्यास भारतीय भाषेतून सुधा ब्लॉग लिहून करियर करने शक्य होऊ शकते. सुरुवातीला छंद म्हणून सुरु केलेल्या ब्लॉगद्वारे तुम्ही प्रतिसाद वाढल्यावर जाहिरातीद्वारे पैसे कमवू शकता आणी पार्टटाईम तुमचं ब्लॉगिंग सुरु ठेवू शकता. कालांतराने नियमित इन्कम येऊ लागल्यावर पूर्णवेळ ब्लॉगिंगकडे वळू शकता. आणी नाही जरी पूर्णवेळ ब्लॉगिंग कडे वळताआलं तरी जी काही थोडीफार इन्कम होईल तीचा पार्टटाईम इन्कम म्हणून वापर करू शकता.. आणी ते पण शक्य नाही झालं तरी एक छंद आणी आवड म्हणून आपण ब्लॉगिंग तर नक्कीच करू शकतो. त्यातून एक वेगळच समाधान मिळेल आणी आनंदही.