30 May, 2014

झुळूक

आजच्या इंटरनेटच्या, स्मार्ट फोनच्या, अंड्रोईड इ. च्या हायटेक जगात 'झुळूक' या शब्दाबद्दल देखील नुकत्याच तारुण्यात आलेल्या वा नुकत्याच मिसरूड फुटलेल्या युवकाला माहिती असेलच असे वाटत नाही. इतर ओल्डएज गोष्टीसारखा हा शब्द आणी त्याचा अनुभव देखील कालबाह्य होत चालला आहे.  चार भिंतीच्या आत मिशनवाले गेम्स, फेसबुक, ट्वीटर, WatsApp किवा वेब कॅमेरावर मित्र- मैत्रिणींशी गप्पा करत ज्यांचा दिवस जातो त्यांचा या 'झुळूक' नावाच्या गोष्टीशी तरी कसा संबंध येणार? असो.

झलुकेवर लिहिण्याच कारण एवढच कि कालच माझा तिच्याशी संबंध आला. एव्हाना वाऱ्याची झुळूक म्हटली कि आठवतो तो पावसाळा आणी हिवाळापण. मस्त जोरदार पाऊस पडल्यावर वातावरण कसं थंड होत. एक हलकीशी वाऱ्याची झुळूक आधीच प्रफ्फुलीत झालेलं मन आनंदाच्या शिखरावर नेऊन ठेवते. वातावरण कसं अगदी टिपिकल रोम्यांटीक होऊन जातं . झुळूकेबरोबर आलेला गारठा मन आणी शरीर, दोनीही शाहारवून टाकतो. पण मला काल मिळालेल्या उबदार झुळूकेचा अनुभव गर्मीत आनंद देणारा होता. 

महाराष्ट्रातलं आणी सद्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच उष्ण शहर म्हणजे चंद्रपूर. सूर्याचं आग ओकनं काय असते हे खरच ज्याला अनुभवायचं आहे त्याने या दिवसात म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीच चंद्रपुरात येऊन राहावं. आणी A /C  खोलीत बसून चंद्रपूरच्या उष्णतेवर नुसता शाब्दिक कीस पडणाऱ्यांनी तर खरच एकदा डेरिंग करावं मे महिन्याच्या अखेरीच एक हफ्ता चंद्रपुरात काढण्याचा. खर सांगतो, 'टाके ढिले होणं' ह्या वाक्प्रचाराचा खरा अर्थ कळेल तुम्हाला. आणी त्यातल्या त्यात जर लाईट गेली तर मग देव पाण्यात ठेवण्यावाचून दुसरा पर्याय नाही. भट्टीत बसल्यावर कसं वाटतं याचा अनुभव घ्याल तुम्ही.

काल तसच घडलं. दुपारी 3 वाजताच तापमान 46.6 डिग्री. से. होतं. (AccuWeather वरून मी इतक्यात रोज दुपारी तापमान बघत असतो म्हणून माहीत झालं होत). रात्री 9 च्या सुमारास लाईट गेली. नुकतच जेवण झालं होत. एव्हाना केव्हाही लाईट गेली कि लवकर येते. लोड शेडींग पण नाही आहे. कारण वर सांगितलेलंच आहे. आणी भारतातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्रपण इथेच, त्यामुळे बरीच ओरड होते लोड शेडींग राहिली की. विषयांतर झालंच वाटते. माफ करा.

तर, रात्री 9 च्या सुमारास लाईट गेली तर वाटलं येईल 5-10 मिनिटात. पण अर्धा तास झाला तरी लाईट येण्याच नावच नाही. आता मात्र खरच भट्टीत बसल्यासारखं वाटत होत. त्या वेळेच तापमान 40-38 डिग्री. से. च्या तर नक्कीच कमी नव्हतं.  आता मात्र पाणी नाकाच्या वर जायला लागलं होत. घरचे सगळे त्रासले. मी चक्क घामाने डबडबलो होतो. घामाच्या धारा वाहायला लागल्या होत्या. जीव कासावीस होत होता. एवढ्या गर्मीत शांत बसने देखील मुश्कील होऊन जाते तिथे झोपणे किव्हा एखादे काम करणे तर अशक्यच आहे. आता लाईनमन आणी MSEB च्या नावाने खडे फोडण सुरु झालं होत. मी बाहेर वऱ्हांड्यात खुची टाकून बसलो पण बाहेर वारा नसल्याने तिथे सुधा उकडत होत. घाम पुसून- पुसून देखील किती पुसणार? एवढ्या उकाड्यात AC/ कूलर शिवाय काहीच पर्याय नसतो. आम्हा चंद्रपूरकरांना तर नाहीच नाही. 

लाईन जाऊन तासभर होऊन गेले तरी लाईट यायचा काही पत्ता नाही. तेव्हा अचानक वाऱ्याची हलकीशी झुळूक आली. गरम झुळूक. आणी माझ्या ओल्याचिंब शरीराला गारवा देऊन गेली. शहारे पण आले अंगावर. काय सांगू तुम्हाला, किता सुखद अनुभव होता तो! तहानलेल्याला पेलाभर थंडगार लस्सी किवा पाणी मिळाल्यावर कसं वाटतं अगदी तसाच अनुभव. जाम हायसं वाटलं त्या वाऱ्याच्या झुळुकेने. नकळतच वाऱ्याचे आभार मानले. त्यानंतरचा एक तास या वाऱ्याच्या झुळुकेनेच तारलं मला. एवढा सुखद आनंद होता तो कि पुन्हा एकदा ह्या झुळूकेचे महत्वं पटले.

जीवनात अश्या छोट्या- छोट्या गोष्टीने देखील किती आनंद मिळतो मनुष्याला. फक्त ती वेळ आणी तो क्षण महत्वाचा असतो. निसर्गापेक्षा जास्त चांगले आणी आश्चर्यकारक सरप्राईज अजून कोण देऊ शकतो मनुष्याला?  रडवतोही तोच आणी हसवतोही तोच. तोच घेतो  आणी तोच देतो योग्य वेळ आल्यावर. बाप आहे तो सर्वांचा.

Image Credit- Gettyimages.com

No comments:

Post a Comment